आमच्याबद्दल
सांगली आणि सातारा मधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यांचे हक्काचे मायेचे घर
आयुष्याच्या संध्याकाळी हसू आणि शांतता परत आणण्याचा प्रयत्न
वृद्ध सेवाश्रम निराधार, गरजू किंवा कुटुंबाचा आधार नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि आपुलकीचे वातावरण देण्यासाठी कार्यरत आहे. अन्न आणि औषधांइतकीच संवादाची, आपलेपणाची आणि आदराची गरज असते.
निवास, पौष्टिक शाकाहारी आहार, दैनंदिन कामात सहाय्य, आरोग्याची काळजी, प्रार्थना, विरंगुळा आणि सामुदायिक सहभाग यांची व्यवस्था केली जाते.
- देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राष्ट्रीय पुरस्कार
आपल्या वृद्धसेवाश्रमामध्ये सर्व वृद्धांना तळमळीने व आपुलकीने सेवा दिली जातेच, त्याचबरोबर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निमंत्रित करून वृद्धांशी संवाद साधण्यास प्रोत्साहन दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या सेवेबरोबरच समाजातील ज्येष्ठांच्या प्रती आदर व मानवतेची शिकवण दिली जाते.
या आमच्या सेवाकार्याची नोंद घेऊन सन २०१३ साली ज्येष्ठांची सेवा करणारी व समाजात ज्येष्ठांविषयी आदर निर्माण करणारी देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून भारत सरकारने तत्कालीन राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून आपल्या संस्थेच्या कार्याचा उचित गौरव केलेला आहे.
१) वृद्धसेवाश्रम, सांगली - सुवर्णमहोत्सवी वाटचाल
ख्रिस्तवासी जोसेफ फर्नांडीस साहेबांना अभिप्रेत असलेल्या विचार व कृतीप्रमाणे संस्थेचे हे लहानसे रोपटे त्यांच्या पश्चात माजी आमदार प्रा. शरद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढविले. समाजातील दानशूर व सेवाभावी संस्थांच्या मदतीवरती आज या संस्थेने दमदारपणे सुवर्णमहोत्सवी वाटचाल केलेली आहे.
ही संस्था समाजातील सर्व जाती-धर्मांच्या गरजू स्त्री-पुरुषांना चांगल्या प्रकारे अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय सेवा पुरविण्याचे उदात्त कार्य गेली ५० वर्षे अखंडपणे करीत आहे. या संस्थेने आजपर्यंत महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील ९५० हून अधिक वृद्ध स्त्री-पुरुषांची सेवा निरपेक्षपणे केली आहे. संस्थेला ५० वृद्धांची शासकीय मान्यता असतानाही संस्थेच्या विविध शाखेत १२० वृद्ध आश्रयास आहेत. दिवसेंदिवस या वृद्धाश्रमात येऊ इच्छिणाऱ्या वृद्धांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कमीत कमी १०० वृद्धांची सोय या आश्रमात करण्याच्या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ प्रयत्नशील आहेत.
२) आंबेवाडी (मेघजीभाई वाडी) कुष्ठरोगी वसाहतीची रौप्यमहोत्सवी वाटचाल
आंबेवाडी (मिरज) येथे कुष्ठरोगावर उपचार घेत असलेल्या व उपचार घेऊन बरे झालेल्या लोकांच्या उपजीविकेच्या समस्यांची तीव्रता जाणवल्याने संस्थेचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी १९९७ साली ही कुष्ठरोगी वसाहत सुरू केली. येथेही वृद्धसेवाश्रमाप्रमाणेच सेवा व सुविधा दिल्या जातात. या वसाहतीची सेवा शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय सुरू आहे. आजपर्यंत सुमारे २१० हून अधिक कुष्ठरोग्यांनी येथील सेवेचा लाभ घेतला असून सध्या २५ कुष्ठरोगी या आश्रमात आहेत. या आश्रमाची वास्तू जुनी झाली असून तिची पडझड सुरू आहे, त्यामुळे या आश्रमाच्या वास्तूचे नूतनीकरण करण्याचे आव्हान आमच्या समोर आहे.
३) मातोश्री वृद्धसेवाश्रम, महागांव, सातारा
सातारा जिल्ह्यातील महागांव येथील बंद पडलेला मातोश्री वृद्धाश्रम सन २००७ पासून या संस्थेने शासनाकडून विना-अनुदान तत्त्वावर चालविण्यास घेतलेला आहे. हा आश्रम आज १५ वर्षे समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे अखंडपणे सुरू आहे. आज या आश्रमात ३० हून अधिक स्त्री-पुरुष आश्रयास आहेत.
४) विरंगुळा केंद्र, कुपवाड
कुपवाड परिसरातील वृद्ध स्त्री-पुरुषांसाठी विरंगुळा केंद्रही या संस्थेने सुरू केले आहे. या केंद्रामध्ये आरोग्य शिबिर, मनोरंजनाचे व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे त्यांच्या कौटुंबिक समस्यांविषयी मार्गदर्शन करून त्यांना सेवा व मदत दिली जाते.
आमची मूल्ये
- अवलंबित्वापूर्वी सन्मान
- भेदभावाविना करुणा
- स्वच्छ, सुरक्षित आणि पारदर्शक कामकाज
- देणगीचा जबाबदार वापर
- प्रत्येक रहिवाशाच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर
ट्रस्ट माहिती
ट्रस्ट नोंदणी
F-334/Sangli Maha/375/Sangli